चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील गुळी नदीवरील पुलाची देखभाल व दुरूस्ती करावी अशी मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी केली होती. दरम्यान गुळी नदीवरील पुलाच्या दुरुस्ती प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती बाविस्कर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
तालुक्यातील गुळी नदीवरील पुलाची देखभाल व दुरुस्ती व्हावी, यासाठी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. याबाबतची मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ऑनलाईन मिडीया व वृत्तपत्रीय माध्यमांद्वारे केलेली होती. त्यानुसार म.अधीक्षक अभियंता, सा.बां.मंडळ, जळगाव यांनी २५ ऑगस्ट २०२० रोजी सा.बां.प्रादेशिक विभाग, नाशिक यांचेकडे गुळी नदीवरील पुलाची दुरुस्ती बाबतचे पत्र पाठविले. तसेच चोपड्याच्या कर्तव्यदक्ष आमदार लताताई सोनवणे यांनीही २७ ऑगस्ट २०२० रोजी नाशिक सा.बां.विभागाला पत्र पाठवून सदर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुल दुरुस्तीच्या कामास मंजुरी मिळावी,अशी शिफारस केलेली होती.त्यानुसार दि.२८.८.२०२० रोजी सा.बां. प्रादेशिक विभाग नाशिक यांनी सा.बां.जळगाव यांचेकडे सन २०२०..२०२१ साठी पूल दुरुस्ती अंतर्गत नवीन प्रस्तावित कामांना मंजुरी देणारे पत्र पाठवले आहे. त्यात सदर पुलाचे तात्काळ संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करूनच दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.यासाठी अंदाजित १ कोटी रूपये रक्कम मंजुर केलेली आहे. असेही पत्रात नमूद केलेले आहे.अशी माहिती गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.
याबाबत चोपडा सा.बां. उपविभागाचे शाखा अभियंता साहेब यांनीही सांगितले की,गुळी नदीवरील पुलाबाबत नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. या पुलाच्या दुरुस्तीचे कामास मंजुरी मिळालेली आहे. तरिही भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन ह्या पुलाची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशीही आग्रही मागणी चोपडा मार्केट कमेटिचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांनी केलेली आहे.