जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्प या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात ३.१२ हेक्टर एवढी वन जमीन प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्यात बुडीताखाली जाते. ती जमिनीला तत्वतः मान्यता मिळाली असून अंतिम मान्यतेसाठीचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेश पाटील यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला.
या प्रकल्पासाठी लगणारी वन जमीन कमळगाव, वडगाव, पिंपरी तालुका चोपडा व जळोद तालुका अमळनेर या गावात मिळून एकत्रितरित्या ३.१२ हेक्टर एवढी आहे.
या जमिनीसाठी केंद्रीय वन व पर्यावरण विभागाने तत्वतः मान्यता सन २०१२ मध्ये दिली होती व त्यानंतर जमिनीच्या संपादनासाठी जामनेर तालुक्यातील भागदरा या गावातील शासकीय जमीन वन विभागास हस्तांतरण करून रु. ५.५० कोटी एनपीव्ही व इतर खर्च मिळून जमा केलेले आहेत. सन २०२२ मध्ये वनविभागाने तत्वतः मान्यतेस दीर्घ कालावधी झाल्यामुळे नव्याने तत्वतः मान्यता घेण्याबाबत कळविले होते. त्यानुसार या प्रकल्पासाठी लागणार्या वन जमिनीसाठी प्रस्ताव वन विभागाकडे ऑनलाईन सादर केलेला असून या प्रस्तावाप्रमाणे स्थळ पाहणी पूर्ण झालेली असून जळगाव उपवन संरक्षक आणि यावल या कार्यालयाने मूल्यांकन इत्यादी सह प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयास मुख्यवन संरक्षक,धुळे यांच्याकडे सादर केले जाणार आहे.
निम्न तापी प्रकल्पाच्या वन विभागाच्या अटी व शर्ती परवान्यासह ३.१२ हे. वन जमीन प्रस्तावास अंतिम मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.