Home Cities पाचोरा पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते दुरुस्ती कामांना मंजुरी : आमदार किशोर पाटील 

पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते दुरुस्ती कामांना मंजुरी : आमदार किशोर पाटील 


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील रस्ते सुधारणा व पुलांच्या कामांसाठी तब्बल २५ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे हाती घेतली जाणार असून त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक सुविधा अधिक सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार किशोर पाटील यांनी ही माहिती दिली. या वेळी बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपजिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष किशोर बारावकर आणि लखीचंद पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अर्थसंकल्पीय तरतुदीतून सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाचोरा यांच्या माध्यमातून ही कामे मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पाचोरा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्ती व सुधारणा कामांसाठी एकूण १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये हडसन ते दुसखेडा रस्ता सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये, बदरखे दिघी ते दिघी फाटा रस्ता सुधारणा २ कोटी ५० लाख रुपये, पहाण-मोहाडी-साजगाव रस्ता व मोहाडी गावातील काँक्रीट गटारांसह सुधारणा कामांसाठी २ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच भातखंडे-अंतुर्ली-ओझर रस्ता सुधारणा २ कोटी ५० लाख रुपये, नगरदेवळा-चुंचाळे-गाळण-शिंदाड-पिंपळगाव रस्ता सुधारणा २ कोटी ५० लाख रुपये आणि नगरदेवळा स्टेशन ते नगरदेवळा रस्ता सुधारणा २ कोटी ५० लाख रुपयांची कामे मंजूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

भडगाव तालुक्यातील विविध रस्ते व पुलांच्या कामांसाठी १० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. आर्वी-शिरुड-पळासखेडे रस्त्यावर लहान पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी ७५ लाख रुपये, आर्वी-शिरुड-पळासखेडे-भडगाव रस्त्यावर दुसऱ्या लहान पुलासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच भडगाव-वाक रस्त्यावरील गिरणा नदीवरील मोठ्या पुलाचे उर्वरित बांधकाम व वाक बाजूच्या जोडरस्त्यांसाठी २ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कजगाव-कनाशी-कोठली-भडगाव रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय मौजे वडगाव येथे नगरदेवळा गावाजवळील आर.ओ.बी. बांधकामासाठी भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या विकासकामांमुळे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील ग्रामीण रस्ते अधिक मजबूत व सुरक्षित होणार असून शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच परिसरातील गावांमधील संपर्क सुधारल्यामुळे आर्थिक व सामाजिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीमुळे वाहतूक सुविधा सुधारण्यास मदत होणार असून नागरिकांना सुरक्षित आणि सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला.

 


Protected Content

Play sound