मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्यानंतर आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये सतेज पाटील, अमिन पटेल, अमित विलासराव देशमुख, विश्वजित कदम आदी नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदा-या सोपवण्यात आल्या आहेत.
विधानसभेतील काँग्रेसच्या उपनेतेपदी आ. अमीन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांची आणि सचिव पदी आ. डॉ. विश्वजीत कदम यांची निवड करण्यात आली आहे. त्याबरोबरच प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
विधानपरिषदेत गटनेतेपदी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर मुख्य प्रतोदपदी आ. अभिजीत वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.