Home Cities भुसावळ भुसावळ नगरपरिषदेत ५ नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती ; माजी आमदार संतोष चौधरींची सभागृहात...

भुसावळ नगरपरिषदेत ५ नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती ; माजी आमदार संतोष चौधरींची सभागृहात एन्ट्री


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषदेत नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक राजकारणात महत्त्वपूर्ण हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा व नगरपंचायती (नामनिर्देशन सदस्यांची अर्हता व नियुक्तीची पद्धत) नियम, २०१० अंतर्गत एकूण पाच नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे नगरपरिषदेतील सत्तासमीकरणे अधिक ठळक झाली आहेत.

भुसावळ नगरपरिषदेत एकूण ५१ सदस्य असून त्यामध्ये एक नगराध्यक्ष आणि ५० नगरसेवकांचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर पक्षनिहाय सदस्यसंख्या लक्षात घेऊन नामनिर्देशित सदस्यांची वाटणी करण्यात आली. जिल्हा निवडणूक कार्यालयाने विविध पक्षांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून या नियुक्त्यांना अंतिम मंजुरी दिली आहे. याआधी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक यशस्वीपणे पार पडली होती.

या नियुक्त्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे तीन नामनिर्देशित सदस्य मिळाले आहेत. भाजपकडून डॉ. प्रसाद वासुदेव बोंडे, नितीन बाबुराव धांडे आणि संजयकुमार सुशिलकुमार नाहाटा यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषद निवडणुकीत भाजपने २७ जागा जिंकत आधीच बहुमत सिद्ध केले होते, आता नामनिर्देशित सदस्यांमुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपक्ष गट, भुसावळ यांच्याकडून एक नामनिर्देशित सदस्य म्हणून संतोष त्रंबक चौधरी, ज्यांना ‘दाढी’ या नावाने ओळखले जाते, यांची निवड झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) व अपक्ष गटाकडून माजी आमदार संतोष चौधरी यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी आमदार संतोष चौधरी यांची नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून झालेली एन्ट्री विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. दीर्घ राजकीय अनुभव असलेल्या संतोष चौधरी यांच्या उपस्थितीमुळे नगरपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांवर संतुलन ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जरी नामनिर्देशित सदस्यांना नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मतदानाचा अधिकार नसला, तरी विविध समित्यांमध्ये सहभाग, विकासकामांबाबत सूचना आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या नियुक्त्या केवळ औपचारिक नसून भुसावळच्या विकासराजकारणावर परिणाम करणाऱ्या ठरण्याची चिन्हे आहेत.


Protected Content

Play sound