जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, जळगाव यांना विविध योजनांसाठी उद्दिष्ट प्राप्त झाले असून पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असे जिल्हा समन्वयकांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
महामंडळाच्या जळगाव येथील कार्यालयास सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता विविध योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यात बीजभांडवल योजनेकरीता 36, थेट कर्ज योजनेच्या रक्कम एक लाख रुपयांपर्यंत 109, वैयक्तिक व्याज परतावा योजनेकरीता 65 व गट कर्ज व्याज परतावा योजनेकरीता 12 एवढे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. महामंडळामार्फत 20 टक्के बीज भाडवल योजना राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येते. यात एकूण मंजूर कर्ज रकमेत महामंडळाचा सहभाग 20टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के व लाभार्थ्याचा सहभाग 5 टक्के आहे. कर्जाची मर्यादा 5 लाख रुपये असून कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्ष आहे. थेट कर्ज योजनेतंर्गत कर्ज मर्यादा 1 लाख रुपये असून अर्जदाराचा सीबिल क्रेडीट स्कोअर किमान 500 आवश्यक आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्ष असून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येत नाही.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना बँकेमार्फत राबविली जाते. कर्जमर्यादा 10 लाख रुपये असून ऑनलाईन महामंडळाच्या या वेबपोर्टलवर www.msobcfdc.org ऑनलाईन नाव नोंदणी करुन कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. कर्ज रकमेचा हप्ता नियमित भरल्यास व्याजाची रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थ्याच्या आधारलिंक बॅक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 8 लाख रुपयांपर्यंत आहे.
लाभार्थी अर्जदार इतर मागास प्रवर्गातील असावा. तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. एकत्रित कुटुंबांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेचा थकबाकीदार नसावा. वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे असावे. पात्र निकषात बसणाऱ्यांनी अर्जासाठी व अधिक माहिती तसेच अटी व शर्तीसाठी आधारकार्ड, जात प्रमाणपत्रासह जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ कॉलनी रोड, जळगाव (दूरध्वनी : 0257-2261918) येथे संपर्क साधावा.