
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इतर मागास विकास विभागांतर्गत कार्यरत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या मार्फत शासन निर्णय व शुद्धीपत्रकांनुसार विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध पुरस्कारांसाठी पात्र व इच्छुक व्यक्ती तसेच संबंधित समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांकडून रितसर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार तसेच क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी हे प्रस्ताव मागविण्यात येत असून संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील सलग व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था अर्ज करण्यास पात्र असतील.
अर्जदार व्यक्ती अथवा संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण, चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबतचा अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येणार असून यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बातमी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दि. २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित पुरस्कारासाठीचे प्रस्ताव संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जळगाव येथील कार्यालयात उपलब्ध असल्याचे सहायक संचालक योगेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.



