जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासनाने विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांना अनुदान थेट व ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्याचा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी युडीआयडी कार्ड आधार कार्डशी संलग्न करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा निर्णय शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट २०२५ नुसार अंमलात आणण्यात आला आहे.
अनुदानात वाढ झाल्यानंतर दरमहा २,५०० रुपये अर्थसहाय्य घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले युडीआयडी कार्ड महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर संलग्न करणेही आवश्यक आहे. यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, युडीआयडी कार्ड तसेच बँक पासबुकच्या छायांकित प्रती सादर करणे बंधनकारक आहे.

ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ही कागदपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांनी २८ जानेवारी २०२६ पूर्वी संजय गांधी योजना शाखा, रेल्वे स्टेशन रोड, जळगाव येथे तात्काळ जमा करावीत. शासनाच्या निर्देशानुसार विहित मुदतीत कागदपत्रांची पडताळणी पूर्ण न झाल्यास संबंधित लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत केली जाणार नाही, असे आवाहन नगरपालिका क्षेत्राच्या तहसीलदार रुपाली काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



