जळगाव प्रतिनिधी । महात्मा गांधी यांची १५० वी जयंती २ ऑक्टोंबर,२०२० रोजी साजरी करण्यात येणार आहे. तसेच ११ ऑक्टोंबर रोजी जागतीक बालिका दिन साजरा करण्यात येणार आहे. या दोन्ही महत्वपुर्ण दिवसाचे औचित्य साधून ”बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियान व्यापक स्वरुपात जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने वैयक्तिक कृतींचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
यामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचा लोगो व टॅग लाईन वापरून वैयक्तिक व्हाट्सअप डीपी व कार्यालयीन व्हाट्सअप ग्रुपवर डीपी ठेवणे. सदरचा लोगो, टॅगलाईन खालील भ्रमणध्वनीवर संपर्क करुन प्राप्त करून घेता येईल. ऑफिस मेल आयडीवर बेटी बचाओ, बेटी पढाओ लोगो ठेवणे, बेटी बचाओ, बेटी पढाओ लोगोची रांगोळी काढणे व फोटो पाठवणे. बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर चित्र काढणे, बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर वक्कृत्व स्पर्धा घेणे, वैयक्तिक तीन ते पाच मिनिटांची व्हिडीओ क्लिप तयार करून पाठवणे. यशस्वी महिलांच्या प्रेरणादायी कार्याचे लेखन 150 शब्दात करुन कार्यालयाच्या मेल आयडीवर पाठविणे. मुलींच्या जन्माचे स्वागत फोटो काढणे, सेल्फी विथ डॉटर फोटो काढणे, बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर कविता वाचन, लेखन व्हिडिओ किंवा मेल पाठवणे. बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर घोषवाक्य तयार करणे, राष्ट्रीय महिला नेत्यांचा पोषाख परिधान करून फोटो काढणे. पंधरा वर्षाखालील दोन मुली असलेल्या कुटुंबाचा फॅमिली फोटो काढून पाठवणे. याप्रमाणे वैयक्तिक कृती करून खालील दिलेल्या मेल आयडी व तालुकानिहाय व्हाट्सअप नंबरवर स्पर्धकाचे नाव, पत्ता, मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांकासह पाठविण्यात यावे. एका स्पर्धकास एकाच कृतीत सहभाग घेता येईल व एकाच कृतीचा फोटो सादर करता येईल.
कार्यालयाचा ई-मेल [email protected] असा आहे. चांगल्या वैयक्तीक कृतीची निवड करून जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मानित करण्यात येईल. सदर सर्व कृती ही वैयक्तिक स्वरूपाची असून कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मास व सोशल डिस्टन्स इत्यादी सर्व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी कळविले आहे.