खामगाव नगरपरिषदेत अपर्णा फुंडकर यांचा दणदणीत विजय 


खामगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या खामगाव नगरपरिषद निवडणुकीत सौ. अपर्णा फुंडकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आयोजित जाहीर सभेत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत हा विजय दिवंगत सासरे, भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यांना समर्पित करत असल्याचे जाहीर व्यासपीठावरून सांगितले.

निकालानंतर झालेल्या सभेत सौ. अपर्णा फुंडकर यांचे भाषण अत्यंत भावस्पर्शी ठरले. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात मार्गदर्शक ठरलेल्या सासऱ्यांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या विचारांवर आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच हा विजय शक्य झाल्याचे नमूद केले. त्यांच्या या वक्तव्याने सभास्थळी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.

या वेळी मंचावर राज्याचे कामगार मंत्री तथा त्यांचे दीर आकाश फुंडकर उपस्थित होते. यासोबतच त्यांच्या मातोश्रींचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली. कौटुंबिक आणि राजकीय एकजुटीचे चित्र या प्रसंगी दिसून आले. विशेष म्हणजे, पती सागर फुंडकर हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांच्या रांगेत उभे राहून आपल्या नवनिर्वाचित पत्नीचे भाषण ऐकत होते, ही बाब अनेकांच्या लक्षात राहिली.

सौ. अपर्णा फुंडकर यांनी आपल्या भाषणात खामगाव शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. जनतेने दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या शब्दांना उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

एकूणच, खामगाव नगरपरिषद निवडणुकीतील हा विजय केवळ राजकीय यश न ठरता, कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता आणि कौटुंबिक मूल्यांचे दर्शन घडवणारा क्षण ठरला आहे.