जळगाव प्रतिनिधी । तक्रारदाराची वडीलोपार्जित शेती वाटणीकरून भाऊ आणि वहिनीच्या नावे लावण्यासाठी सहा हजार रूपयांची मागणी करणाऱ्या तलाठ्यास जिल्हा सत्र न्यायालयाने चार वर्षांच्या सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. या शिक्षेने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील कजगाव येथील रहिवाशी हिलाल फकिरा महाजन यांच्या नावे असलेली वडीलोपार्जित शेती जमीन आहे. त्यांच्यासह पाच भाऊ असून त्यापैकी एक मयत होते. त्यांना त्यांच्या वडीलांच्या नावे असलेल्या शेतजमीनीची सर्व भाऊ आणि वहिनी यांच्या नावे वाटणी करण्यासाठी 19 मार्च 2015 रोजी तलाठी धनराज मोरे याची तलाठी कार्यालयात जावून भेट घेतली असता सदर शेतजमीनीची वाटणी करण्यासाठी त्यांच्याकडे सहा हजार रूपयांची लाचेची मागणी म्हणून मुलगा भानुदास याच्यामार्फत 23 मार्च रोजी रक्कम स्विकारतांना रंगेहात एसीबी पथकाने पकडले होते. याप्रकरणी आज न्यायालयात कामकाज होवून सरकारी वकील ॲड. देशपांडे यांनी प्रभावी युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी.वाय.लाडेकर यांनी लाचखोर तलाठी धनराज भावराव मोरे याला दोषी ठरवत लाच मागीतल्याप्रकरणी तीन वर्षे सक्त मजूरी आणि 10 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्याची साधी कैद तसेच लाच स्विकारल्याप्रकरणी चार वर्षाची सक्तमजूरी आणि 10 हजार रूपये दंड , दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.