फैजपूर प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या वतीने उत्तरपत्रिका मूल्यांकन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन आज (दि.11) सकाळी 10 वाजता करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कबचौ उमवि जळगाव येथील प्रा.डॉ.ए.बी.चौधरी हे होते. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.पी.आर चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यापीठ प्रशासनातील मान्यवरांचे आणि यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर आणि भुसावळ आदी तालुक्यातील प्राध्यापकांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले आणि कर्तव्याचा भाग न समजता चांगल्या मानसिकतेतून विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्याचे परस्पर सहकार्यातून ध्येय साध्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.डॉ.बी.पी.पाटील यांनी सखोल सांख्यिकीय माहितीच्या आधारे उत्तरपत्रिका मूल्यांकन मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्देश उपस्थितांसमोर मांडले. त्यांनी प्राध्यापकांचे योगदान अत्यंत मोलाचे असून भावी पिढी घडविण्यात प्राध्यापकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन केले. प्राध्यापक संघटनांच्या वतीने एन मुक्ता संघटनेचे अध्यक्ष प्रा.नितीन बारी, एन मुकटो संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय सोनवणे आणि एन मुक्ता संघटनेचे सचिव प्रा.डॉ.अविनाश बडगुजर यांनी प्राध्यापकांची भूमिका विद्यापीठ प्रशासनासमोर मांडली. प्राध्यापक संघटनेच्या वतीने उत्तरपत्रिका मूल्यांकनाच्या बाबतीत प्राध्यापकांच्या भूमिकांचा विचार करून आवश्यक ते बदल करावेत, असे देखील त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा प्रा.डॉ.ए.बी चौधरी, संचालक परीक्षा मूल्यमापन मंडळ बी.पी.पाटील, एन मुक्ता अध्यक्ष प्रा.नितीन बारी, प्रा.डॉ.संजय सोनवणे, सचिव प्रा.डॉ.अविनाश बडगुजर, सहाय्यक कुलसचिव आर.पी.पाटील, प्रा.डॉ.के.जी कोल्हे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे, एस.बी. हातागडे, कक्षाधिकारी अनिल आर वाणी, वरिष्ठ सहाय्यक यांच्यासोबत परिसरातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र राजपूत यांनी तर आभार आर.पी.पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, शेखर महाजन, चेतन इंगळे, धनू माळी, गुलाब वाघोदे, यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.