जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील फसवणूक, अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणात संशयित असलेल्या मीना प्रकाश बोरसे (रा. जळगाव) या महिलेला रामानंद नगर पोलिसांनी मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर न्यायालयाच्या बाहेरून ताब्यात घेतले. या प्रकरणातील इतर संशयितांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
या प्रकरणातील मुख्य गुन्हे असे आहेत: शहरातील हरिविठ्ठलनगरातील एका मुलीचे कोल्हापूर येथील तरुणाशी लग्न लावून दिल्यानंतर, लग्नासाठी घेतलेले पैसे आणि सोने परत देण्याचा तगादा लावल्यामुळे मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच, कोल्हापूर येथील तरुणाची दोन लाख रुपये रोख आणि चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यांमध्ये यापूर्वीच मिनाक्षी उर्फ मनिषा दिनेश जैन उर्फ पल्लवी राजपूत (वय ३३, रा. विवेक कॉलनी, जळगाव) आणि रमा सुशील कनौजिया (वय ३६, रा. चुंचाळे शिवार, नाशिक) यांना अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांना आता अत्याचार प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातही ताब्यात घेतले जाणार आहे.
या प्रकरणात पाहिजे असलेली संशयित मीना बोरसे ही पोलिसांना मिळून येत नव्हती. दरम्यान, ती मध्य प्रदेशातील खिरापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यासंबंधी बुऱ्हाणपूर न्यायालयात येणार असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथक तयार करून मीना बोरसे हिला न्यायालयाबाहेर पडताच ताब्यात घेतले.
अटकेत असलेल्या महिलांकडून पैसे घेऊन मुलींचे लग्न लावून दिल्याप्रकरणी परभणी येथील गंगापूर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असून, तो रामानंद नगर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस या गुन्ह्याचाही तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही एक बनावट लग्न लावणारी टोळीच कार्यरत असल्याचे समोर आले आहे. यातील मिनाक्षी उर्फ मनिषा दिनेश जैन उर्फ पल्लवी राजपूत हिच्याविरुद्ध यापूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथेही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
बालविवाह आणि पोस्को (POCSO) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले पीडितेचा पती आशिष गंगाधरे आणि मीना जैन यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर, त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणाच्या सखोल तपासामुळे या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.



