
पटना-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । एनडीएच्या ऐतिहासिक विजयाने संपलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतर महागठबंधन आणि विशेषतः राष्ट्रीय जनता दलामध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. आधीच पक्ष आणि कुटुंबातील अंतर्गत मतभेदांविषयी कुजबुज सुरू असताना आता रोहिणी आचार्य यांनी केलेल्या धक्कादायक घोषणेमुळे यादव कुटुंबातील संघर्ष खुलेपणे बाहेर आला आहे. 2022 मध्ये ज्यांनी आपल्या वडिलांना किडनी देऊन सर्वांना भावुक केले होते, त्या रोहिणी यांनी आता राजकारण सोडण्याबरोबरच कुटुंबाशी सर्व संबंध तोडण्याचा निश्चय जाहीर केला आहे.

बिहारच्या राजकारणात पाऊल टाकल्यापासूनच रोहिणी आचार्य सक्रियपणे काम करत होत्या. मात्र शनिवारच्या त्यांच्या एक्स (Twitter) पोस्टने RJDमध्ये भूकंप घडवला. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “मी सर्व चुका आणि आरोप स्वतःवर घेत आहे, जसे की संजय यादव आणि रमीज यांनी मला करायला सांगितले. आता मी राजकारण सोडत आहे आणि माझ्या कुटुंबाशी नाते तोडत आहे.” त्यांच्या या वक्तव्याने थेट राज्यसभा खासदार आणि तेजस्वी यादव यांचे सर्वात जवळचे सहकारी संजय यादव यांच्यावर बोट ठेवले आहे.
यादव कुटुंबात संजय यादवविरोधातील नाराजी ही पहिल्यांदाच समोर आली नाही. यापूर्वी तेज प्रताप यादव यांनीही संजय यादव यांच्यावर गंभीर आरोप करत RJDपासून स्वतःला वेगळे केले होते. त्यांनी तर अनेक वेळा संजय यादव यांना ‘जयचंद’ म्हणत आरोपांचा भडीमार केला होता. आता त्याच सुरात रोहिणी आचार्यही बोलू लागल्याने कुटुंबीय कलह तीव्र होत चालल्याचे संकेत मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वीही त्यांनी तेजस्वी यादव यांच्या ‘बिहार अधिकार यात्रा’च्या बसमध्ये संजय यादव फ्रंट सीटवर बसल्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला होता.
या सर्व घडामोडींमध्ये एकच प्रश्न पुढे आला आहे— अखेर हा संजय यादव कोण? संजय यादव मूळचे हरियाण्यातील महेंद्रगढ येथील. ते शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत प्रगल्भ मानले जातात. त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये M.Sc आणि नंतर MBA केले आहे. व्यवस्थापन, डेटा विश्लेषण आणि रणनीती तयार करण्यात त्यांचे कौशल्य मान्यताप्राप्त आहे. राजकारणात येण्याआधी ते एका खासगी कंपनीत काम करत होते. हरियाणवी लहेजात बोलणाऱ्या संजय यादव यांचे बिहारच्या राजकारणातील प्रभाव मात्र कोणत्याही दिग्गजांपेक्षा कमी नाही.
संजय आणि तेजस्वी यांची मैत्रीही जुनी. दिल्लीमध्ये दोघे प्रथम भेटले आणि क्रिकेट खेळता-खेळता मैत्री वाढत गेली. 2012 पासून ते RJDमध्ये सक्रिय झाले आणि लवकरच तेजस्वी यादव यांचे विश्वासू म्हणून ओळख निर्माण झाली. संजयने नोकरी सोडून पूर्णवेळ राजकारणात प्रवेश केला आणि 2015 पासून RJDची निवडणूक रणनीती सांभाळण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 2024 मध्ये त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आले. 2025 च्या विधानसभा निवडणुकीतही संजय यादव यांनी टिकट वितरण, सीट शेअरिंग, सोशल मीडिया पोहोच आणि रणनीती सर्व पातळ्यांवर स्वतःचा प्रभाव राखला. अनेक निर्णय त्यांच्या सल्ल्यावर झाल्याचा आरोप पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार केला आहे.
निवडणुकीच्या पराभवामुळे आधीच नाराज असलेल्या पक्ष नेतृत्वाला आता कुटुंबातील वाढत्या दरीचाही सामना करावा लागत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कुटुंबातील रोहिणी आणि तेजप्रताप यांच्या नाराजीला गांभीर्याने घेत लालू प्रसाद यादव संजय यादवविरुद्ध कारवाई करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंग घेत आहे.



