एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील खडके येथील बालगृहात एका मुलावर देखील अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले असून या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे. तर या अत्याचार प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष आणि त्याच्या दोन्ही मुलांविरूध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, एरंडोल तालुक्यातील खडके या गावातील बालगृहातल्या अत्याचाराच्या प्रकरणाने परिसर हादरला आहे. यात संस्थेचा केअरटेकर अर्थात काळजीवाहक असलेल्या नराधमाने पाच अल्पवयीन मुलींचे शोषण केले असून यात त्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याची उघडकीस आले असून या प्रकरणी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर तक्रारी करून देखील याकडे दुर्लक्ष करणारी आणि बालगृहाची अधिक्षीका म्हणून काम करणार्या त्याच्या पत्नीलाही अटक झाली आहे. या प्रकरणात आधी संस्थेच्या सचिवाच्या विरूध्द देखील गुन्हा दाखल असला तरी तो फरार झाला आहे.
दरम्यान, वासनांध गणेश पंडित याने एका अल्पवयीन मुलावरही अनैसर्गिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. तसेच होळीच्या काळात पंडित याने फुस लाऊन अन्य अल्पवयीन मुलांच्या माध्यमातून त्याला मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे या प्रकरणी नव्याने स्वतंत्र गुन्हा दाखल झालेला आहे. तर, याच प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर यशवंत पाटील आणि त्यांची सचिन पाटील व भूषण पाटील ही दोन मुले यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे.