चाळीसगाव (वृत्तसंस्था) शहरातील कोदगाव रोडवरील कृष्णराव देशमुख यांच्या घरावर दि २६/६/२०१५ रोजी रात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. त्यात राहुल कृष्णराव देशमुख (२३) याचा खुन करुन ६ लाख ७० हजार रुपये रोख व सोन्याचे दागीने असा १० लाख ३४ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता. त्या गुन्ह्यातील रमेश छगन भोसले (२९) रा. साईनाथनगर नागफणी ता. नेवासा, जि. अहमदनगर या आरोपीस चाळीसगावचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सुधीर पाटील व पथकाने नाशिक मध्यवर्ती कारागृहातुन ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडुन इतर फरार आरोपींची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरोडा प्रकरणातील नऊ पैकी पाच आरोपींना पूर्वीच अटक करण्यात आली होती तर चार आरोपी फरार होते. रमेश भोसले याने नेवासा, जि.अहमदनगर येथे अशाच प्रकारचा गुन्हा आरोपीने २०१७ मध्ये साथीदारांसह केला होता. त्यात पुर्ण कुटुंबाचा खुन करुन लुट केली होती, त्यावेळी पो.उ.नि. सुधीर पाटील हे नेवासा येथे होते, त्यांनी आरोपीस अटकही केली होती. सदर आरोपी हा चाळीसगावच्या गुन्ह्यात फरार असल्याने व गुन्ह्याची पद्धत सारखी असल्याने त्यांनी तपासाची चक्रे फिरवुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरील आरोपीस नाशिक येथुन ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडुन मुद्देमाल व इतर आरोपींबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे.