मुंबई वृत्तसंस्था । इन्फोसिसमध्ये अनुचित प्रकार घडल्याचा दावा कंपनीमधील आणखी (व्हिसलब्लोअर) एका कर्मचाराने केला आहे. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी पारेख यांनी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला, असा कर्मचारीचा दावा आहे. कंपनीचे चेअरमन आणि संचालक मंडळाला त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
इन्फोसिसचे मुख्यालय बेंगळुरूमध्ये असून या कंपनीच्या नियमानुसार कंपनीच्या सीईओंनी बेंगळुरूच्या मुख्यालयातच कार्यरत असणे आवश्यक आहे. मात्र २० महिन्यांपूर्वी इन्फोसिसमध्ये रूजू झालेल्या पारेख यांनी बेंगळुरूच्या मुख्यालयातून काम करणे टाळले असून ते मुंबईतील कार्यालयातून कारभार करत आहेत, असे या निनावी व स्वाक्षरी नसलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र आपण कंपनीच्या अर्थ विभागात कार्यरत आहोत, असे या तक्रारदाराने स्पष्ट केले आहे. कंपनीचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आले आहे. पारेख हे महिन्यातून दोनदा मुंबईतून बेंगळुरू येथे येतात. त्यासाठीचे विमानाचे बिझनेस श्रेणीचे तिकीट व अन्य प्रवास खर्च मिळून त्यांच्यावर आतापर्यंत २२ लाख रुपये खर्च झाला आहे, याकडे या पत्रात लक्ष वेधले आहे.