‘एंजल्स फुड’ ग्रुपला अज्ञात दात्याची भरीव मदत

5e7f4301 1f2f 4c01 8508 ff7a650b081e

 

जळगाव (प्रतिनिधी) एकीकडे अन्नाची नासाडी तसेच वाया जाणाऱ्या अन्नाला सरळ कचरापेटीत टाकण्याची प्रवृत्ती तर दुसरीकडे एकेक घासासाठी मोताद झालेल्यांचा व्याकुळ समुदाय अशा विषमतेला दुर करण्याचे काम जळगावातील ‘एंजल्स फुड’ या चळवळीच्या संदर्भात ‘लाईव ट्रेंड्स न्यूज’ने विशेष वृत्त प्रसारित केले होते. एका अज्ञात दात्याने हे वृत्त बघितल्यानंतर ‘एंजल्स फुड’ भरीव मदत केली आहे.

 

शहरातल्या कान्या-कोपऱ्यातून वाया जाणारे अन्न हे भुकेल्यांपर्यंत पोहचवण्याचे काम हे एंजल्स म्हणजेच देवदूत करत आहेत. जळगाव शहरातही ‘द एंजल्स फूड’ नावाने कार्यरत असलेला एक गृप आज समाजातली भूक मिटवण्यासाठी दररोज रात्री शहरातील काही हॉटेलातून शिल्लक राहिलेले व फेकले जाऊ शकणारे अन्न गोळा करतात आणि ते अन्न रात्रीच गरजू अन उपाशी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहेत. दररोज न चुकता हे स्वयंसेवक शहरातल्या सुमारे १५ हॉटेलातून अन्न गोळा करतात आणि अन्नाचा शेवटचा घास शिल्लक असेपर्यंत १५०-२०० लोकांची भूक भागवत असतात. याशिवाय लग्न अथवा धार्मिक समारंभातून शिल्लक राहिलेले अन्न ते दिवसाही गरजूंपर्यंत पोहोचवीत असतात. शहरातील गरिब व वंचितांच्या वस्त्या तसेच रेल्वे स्थानकावर याचे वितरण केले जाते. याबाबत ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’ने बनविलेला खास वृत्तांत बनविला होता.

हा वृत्तांत बघितल्यानंतर परदेशातील एका वाचकाने थेट ‘एंजल्स फूड’चे प्रमुख दानियल शेख यांना संपर्क केला आणि हवी असेल ती, मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार शेख यांनी अन्न गोळा करण्यासाठी भांडी कमी पडत असल्याचे सांगितले. त्यानुसार आवश्यक असलेल्या स्टीलच्या १० मोठ्या टाक्या नुकत्याच ‘एंजल्स फूड’ ला देण्यात आल्या आहेत. दरम्यान, भरीव मदत केल्यानंतर देखील सदर दात्याने नाव सांगण्यास नम्रपणे नकार देत ‘एंजल्स फूड’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एवढेच नव्हे तर, भविष्यात देखील काही मदत लागली तर हक्काने फोन करा असे देखील सांगितलेय. यावेळी दानियल शेख,इम्रान नवाब,अमीर नेहाल,मोहमद अमीर,मुजाहिद काजीम, शोएब नवाब आदी जण उपस्थित होते.

Add Comment

Protected Content