लेवा पाटीदार समाज विकास महामंडळाची घोषणा : समाजातून स्वागत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील एक आघाडीचा समाज असणाऱ्या लेवा पाटीदार समाजासाठी राज्य मंत्रीमंडळाने आज विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली असून याचे समाजातून स्वागत करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यासह लगतचा बुलढाणा जिल्हा, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आदींसह विदेशात लेवा समाजबांधव मोठ्या संख्येने आहेत. समाजातील एक घटक असूनही दुर्बल अवस्थेत असून त्यांच्या उत्थानासाठी स्वतंत्र विकास महामंडळ असावे या मागणीसाठी समाजातील मान्यवरांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ना. रक्षाताई खडसे, आ. राजूमामा भोळे, आ. संजय सावकारे, बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड, राष्ट्रवादीचे रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे आदींनी लेवा पाटीदार समाज विकास महामंडळासाठी पाठपुरावा केला होता. याचीच फलश्रुती म्हणून राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ना. गिरीश महाजन व ना. गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. दरम्यान, लेवा पाटीदार समाज विकास महामंडळाच्या स्थापनेची घोषणा झाल्यानंतर याचे समाजातुन स्वागत करण्यात येत आहे.

Protected Content