मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नेपाळमध्ये देव दर्शनासाठी गेलेल्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव तळवेल-सुसरी येथील भाविकांची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात २५ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. या मयत झालेल्यांच्या वारसांना आचारसंहिता लागू होण्यापुर्वी मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केले आहे.
बसदुर्घटनेत कुटुंबातील प्रमुख व्यक्तींचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना आधार म्हणून केंद्र सरकारने २ लक्ष आणि राज्य सरकारने ५ लक्ष रुपये मदतीची घोषणा केली होती. केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना लक्ष रुपये मदत प्राप्त झाली असुन राज्य सरकार कडून घोषित करण्यात आलेली मदत अद्यापही प्राप्त झालेली नाही. ती विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्या पुर्वी देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ तालुक्यातील व परिसरातील भाविक देवदर्शनासाठी नेपाळ ला जात असताना २३ ऑगस्ट २०२४ रोजी काठमांडू, नेपाळ येथे एका खाजगी बसने प्रवास करीत असतांना ती बस १५० मीटर खोल दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये त्या बसमध्ये प्रवास करत असलेल्या जळगांव जिल्हातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल,सुसरी, दर्यापूर व परिसरातील गावातील २५ व्यक्तींचा दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती या दुर्घटनेमध्ये कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने कुटुंब उघडयावर पडले होते.
कुटुंबियांना मदत म्हणून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना केंद्रशासनाकडून २ लक्ष व राज्य शासनाकडून ५ लक्ष रुपये मदत देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. जळगाव येथे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या “लखपती दीदी” या कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदयांनी राज्य सरकारच्या वतीने पाच लक्ष मदतीची घोषणा केली होती.
केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेली दोन लक्ष रुपये रक्कम मयतांच्या वारसांना आठ दिवसात प्राप्त झाली परंतु मुख्यमंत्री महोदयांनी राज्य शासनाच्या वतीने जाहीर केलेली पाच लक्ष रुपये मदत मुत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना अथवा वारसांना अद्यापही अदा करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी पाच लक्ष रुपयांची जाहीर करण्यात आलेली मदत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्या पुर्वी नेपाळ अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मयतांच्या परिवारास अथवा वारसांना देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आ एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.