रस्त्यांसाठी संतप्त नागरिकांचा महापालिकेवर ठिय्या आंदोलन; आयुक्तांना विचारला जाब !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आशा बाबा नगर, माऊली नगर, अथर्व कॉलनी, आरएमएस कॉलनी आणि गणेश पार्क परिसरातील नागरिकांनी बेशिस्त नागरी सुविधांमुळे महापालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त करत महापालिकेचे आयुक्त यांना घेराव घालून जाब विचारला. दरम्यान आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर नागरीकांनी हे आंदोलन मागे घेतले.

नागरिकांनी थेट महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना घेराव घालून त्यांना जाब विचारला. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहून आयुक्त निघून जाण्याच्या तयारीत असतानाच, आक्रमक झालेल्या महिलांनी त्यांच्या वाहनासमोर ठिय्या मांडला. महिलांच्या विरोधामुळे आयुक्तांना थांबावे लागले. अखेर, त्यांनी स्वतः परिसरात येऊन पाहणी करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या भागातील नागरिकांना रस्त्यांअभावी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अपुऱ्या नागरी सुविधांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. तसेच, सतत धुळीमुळे आणि खडबडीत रस्त्यांमुळे अनेकांना मणक्याचे आजार आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे, “महापालिका प्रशासन माणसं मेल्यावरच रस्ते तयार करेल का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला.

नागरिकांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आशा बाबा नगर, माऊली नगर, अथर्व कॉलनी, आरएमएस कॉलनी आणि गणेश पार्क परिसरातील रहिवासी गेल्या ३० वर्षांपासून रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. अद्याप या भागात रस्ते, पाणी, गटार व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. या भागात जाण्यासाठी फक्त मातीचे आणि खडबडीत रस्ते आहेत, ज्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिका हद्दीतील या परिसरातील नागरीक अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. ग्रामीण भागात काँक्रीटचे रस्ते तयार होत असताना, शहरातीलच काही भाग रस्त्यांपासून वंचित का, असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिकेने तातडीने उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

निवेदनानुसार, महापालिकेने आठवडाभरात योग्य तो प्रतिसाद दिला नाही, तर स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते. आता महापालिकेच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Protected Content