मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ

मुंबई, वृत्तसंस्था | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रचाराचा आज (दि.१९) शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी ६.०० वाजता जाहीर प्रचार समाप्त होणार आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयात आलेल्या निनावी पत्राने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली असून पोलिसांनी याप्रकरणी चौकशीही सुरु केली आहे.

 

मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयाला शुक्रवारी एक निनावी पत्र मिळाले. या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे धमकी दिल्याने मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी अज्ञाताचा शोध घेत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याआधीही फेब्रुवारी महिन्यात जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. पंकज कुंभार नावाच्या एका फेसबुक पेजवरुन ही धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी त्यावेळीही सतर्कता बाळगून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ केली. आता निवडणूक अगदी तोंडावर असताना पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी मुंबईत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीची भव्य सभा झाली. या सभेत पुन्हा एकदा आपले सरकार असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. आज मुख्यमंत्री नागपुरात रोड शो करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही सहभागी होत आहेत.

Protected Content