अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मित्राने बिर्याणी खायला घातली नाही, या अगदी क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या एका तरुणाने आपल्याच परिचितावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमळनेर शहरात घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला असून, अमळनेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कार्तिक दिनेश धाप (वय १६, रा. कोष्टीवाडा, अमळनेर) हा ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत फर्ची पुलाजवळील ‘शिवशक्ती’ नावाच्या दुकानावर सोयाबीन बिर्याणी खाण्यासाठी गेला होता. याच ठिकाणी आरोपी कृष्णा उर्फ ‘अंडापाव’ बिऱ्हाडे हा देखील उपस्थित होता. आरोपीने कार्तिककडे सोयाबीन बिर्याणी खाऊ घालण्याची मागणी केली. मात्र, कार्तिकने “माझ्याकडे पैसे नाहीत, मी तुला बिर्याणी देऊ शकत नाही” असे प्रांजळपणे सांगितले.

या साध्या उत्तराचा राग मनात धरून संशयित आरोपी कृष्णाने कार्तिकला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. संतापलेल्या कृष्णाने आपल्याजवळील एका तीक्ष्ण हत्याराने कार्तिकच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर जोरदार वार केला. या हल्ल्यात कार्तिक रक्ताबंबाळ झाला. उपस्थित मित्र राजेश चंदनशिव आणि सुमित पाटील यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने “तुला सोडणार नाही” अशी धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी कार्तिक धाप याच्या तक्रारीवरून अमळनेर पोलिसांनी संशयित आरोपी कृष्णा उर्फ अंडापाव बि-हाडे याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



