
फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताची सांस्कृतिक, शैक्षणिक आणि बौद्धिक ओळख घडवणारी भारतीय ज्ञान प्रणाली ही देशासाठी अत्यंत समृद्ध आणि अमूल्य वारसा असल्याचे प्रतिपादन प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन यांनी केले. आधुनिक शिक्षणव्यवस्थेत भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश होणे ही काळाची गरज असून त्यातूनच देशाचा सर्वांगीण विकास साधता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

दि. ०५ जानेवारी २०२६ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील PM-USHA सॉफ्ट कॉम्पोनंट विभाग व धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत “भारतीय ज्ञान प्रणाली” या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रासाठी राज्यभरातून जवळपास ४०० प्राध्यापकांनी नोंदणी केली असून महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील नामवंत संशोधक प्राध्यापकांनी १९० पेक्षा अधिक संशोधन निबंध सादर केले आहेत.
या परिषदचे उद्घाटन प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी भारतीय ज्ञान प्रणालीतील तत्त्वज्ञान, विज्ञान, गणित, आयुर्वेद, योग, पर्यावरण आणि सामाजिक मूल्यांचा उल्लेख करत या परंपरेचे जागतिक महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तापी परिसर विद्यामंडळ, फैजपूरचे सहसचिव प्रा. एन. ए. भंगाळे होते. त्यांनी भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अंगीकार दैनंदिन जीवनात करून आपले जीवन अधिक समृद्ध करण्याचे आवाहन केले आणि परिषदेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजन समितीचे विशेष कौतुक केले.
या चर्चासत्राचे बीजवक्ते म्हणून प्रा. डॉ. राजेंद्रकुमार रावल (सी.सी. सेट वाणिज्य महाविद्यालय, अहमदाबाद) यांनी भारतीय ज्ञान परंपरेचा ऐतिहासिक, शैक्षणिक आणि संशोधनात्मक दृष्टिकोनातून सखोल आढावा घेतला. दिवसभरातील प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. संजयकुमार शर्मा, डॉ. तुषार रायसिंग आणि डॉ. एस. ए. पाटील यांनी भारतीय ज्ञान प्रणालीच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करत संशोधनाच्या नव्या दिशा मांडल्या.
कार्यक्रमाच्या मंचावर संस्थेचे सचिव प्रा. एम. टी. फिरके, प्राचार्य प्रा. डॉ. एस. एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे, डॉ. कल्पना पाटील, डॉ. एच. जी. नेमाडे, परिषद समन्वयक डॉ. विजय सोनजे व सहसमन्वयक प्रा. शिवाजी मगर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शिरीषदादा चौधरी, उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद वाघुळदे आणि चेअरमन श्री. लिलाधर चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी केले. दिवसभरातील चारही सत्रांचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, प्रा. ताराचंद सावसाकडे, प्रा. नाहीदा कुरेशी आणि प्रा. सीमा बारी यांनी प्रभावीपणे केले. आभार प्रदर्शन डॉ. विजय सोनजे यांनी तर समारोप सत्र सहसमन्वयक प्रा. शिवाजी मगर यांनी केले.
या चर्चासत्राला महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील संशोधक, मार्गदर्शक व चिकित्सकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. महाविद्यालयातील विविध समिती प्रमुख व सदस्यांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला आणि भारतीय ज्ञान प्रणालीच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.



