यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यवतमाळच्या वणी तालुक्यातील मंदार गावाजवळ प्राचीन काळातील काही दगडी मूर्तीसह इतर वस्तू आढळून आल्या आहेत. या मूर्तीवरुन या परिसरात सातवाहन काळातील शहर असल्याचे मत इतिहास अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यात मंदर गाव शिवारात धंदर नावाने ओळखल्या जाणाऱ्या रीठचा प्रा. सुरेश चोपणे गेल्या अनेक दिवसांपासून संशोधन करीत आहेत. येथे अंदाजे 1800 सालापूर्वी दरम्यान महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या सातवाहन आणि पश्चिम क्षत्रप राज्यातील मोठे शहर असल्याचे पुराव्यावरून सिद्ध झाले आहे. येथे सापडलेली नाणी आणि वस्तू ह्या त्याच काळातील आहे, असे प्रा. चोपणे हयांचे म्हणणे आहे.नुकतेच त्यांना येथील शेतकाऱ्याकडून काही नाणी सापडून आल्याने येथील इतिहासाचा काळ समजू शकला आहे.
एका शेतकर्याकडे जपून ठेवलेल्या तांब्याच्या नाण्यावरून तेथील राज्य आणि राजाचा काळ कळू शकला. ही नाणी इसविसन तिसऱ्या शतकातील पश्चिम क्षत्रप राजाची असून त्यांना ड्रेक्मा असे म्हटले जाते. इथे आढळलेले नाणे क्षत्रप भर्वदामन या राजाचे आहे. भंडारा जिल्ह्यात पवनी येथे देखील रुपीअम्मा नावाच्या शक क्षत्रप राज्याचे राज्य होते. याच दरम्यान सातवाहन काळातील गावे सुद्धा चंद्रपूर आणि यवतमाळ परिसरात होती. वणीजवळील कायर येथे केलेल्या उत्खननात सातवाहन काळातील पुरावे सापडली आहे. त्यामुळे इथेसुद्धा सातवाहन राज्य होते, असे बहुतेक इतिहास अभ्यासकांचे मत आहे. मंदर गावाजवळ जवळपास 2 किमी परिसरात वसलेले गाव होते. मध्यभागी श्रीमंत लोकांची विटांची घरे तर सभोवताली मातीची लहान घरे होती. गावाला पाणी पुरवठा व्हावा म्हणून पूर्वेला आणि उत्तरेला दोन मोठे तलाव बाधले होते, ते आजही शाबूत आहेत. त्यामुळे इथे उत्खनन करावे आणि त्यासाठी पुरातत्व विभाग व नागपूर विद्यापीठने पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रा.सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे. आता प्रशासन याबाबत काय दखल घेते हे पाहणे महत्वाचे आहे. मात्र गावात हा ठेवा सापडून आल्याने साऱ्यांना कुतूहल निर्माण झाले आहे.