

सावदा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा कृषी मंडळातील केळी पीक विमाधारक शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, विमा परतावा वेळेत न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सन २०२४–२५ या वर्षातील केळी पीक विम्याचा परतावा मिळण्याची अंतिम मुदत जवळ येऊनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप त्यांचा हक्काचा विमा परतावा प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आणि हतबलतेची भावना निर्माण झाली आहे.
सावदा, थोरगव्हाण, मांगी, चुनवाडे, सुदगाव, रायपूर, गहूखेडे, रणगाव, तासखेडा, उधळी बुद्रुक, उधळी खुर्द, लूमखेडा आदी परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष वेधले आहे. पीक नुकसानीनंतर विमा परतावा हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक सावरण्याचा महत्त्वाचा आधार असतो; मात्र अपेक्षित कालावधीत रक्कम न मिळाल्याने कर्जफेड, पुढील लागवड आणि दैनंदिन खर्चाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर विमा परतावा न मिळाल्याने येणाऱ्या अडचणी, अडथळे आणि पुढील कृती आराखडा ठरवण्यासाठी सर्व संबंधित शेतकरी बांधवांची संयुक्त चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक २० डिसेंबर २०२५, शनिवार रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता उधळी खुर्द येथील हनुमान मंदिर सभागृहात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत विमा कंपन्यांशी संपर्क, प्रशासनाकडे पाठपुरावा, तसेच आवश्यक असल्यास आंदोलनात्मक भूमिका ठरविण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावदा कृषी मंडळातील सर्व केळी पीक विमाधारक शेतकऱ्यांनी या बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समस्त केळी पीक विमाधारक शेतकरी, सावदा कृषी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.



