
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने १८ वर्षीय दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता घडली. प्रेम उर्फ जयपाल चरणसिंग पाटील (वय १८, रा. लोंढरी, ता. जामनेर, ह.मु. वाळूज, छत्रपती संभाजी नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, मूळचा जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील रहिवासी असलेला जयपाल पाटील हा आपल्या कुटुंबासह सध्या छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी वाळूज परिसरात वास्तव्यास होता. त्याने नुकतेच बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो पुढील शिक्षणाची तयारी करत होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या आजीचे निधन झाल्यामुळे, जयपाल त्याच्या आई-वडील आणि बहिणीसोबत जळगावात राहणाऱ्या मावशीच्या घरी आला होता. मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास तो आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी घराबाहेर पडला. सुप्रीम कॉलनीजवळच्या राष्ट्रीय महामार्गावर पोहोचताच, एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात जयपाल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान दुपारी २ वाजता त्याचा मृत्यू झाला. कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा आक्रोश पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.



