चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील वाघळी रेल्वे स्टेशन जवळ एका अनोळखी व्यक्तीचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी २१ एप्रिल रोजी मध्यरात्री २.३० वाजता उघडकीला आला आहे. या संदर्भात पहाटे ५ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आी आहे. मयताची ओळख पटवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे खंबा क्रमांक ३४० जवळ एका धावत्या रेल्वेच्या धक्का लागल्याने अंदाजे ५० वर्षीय प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी २१ एप्रिल रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या संदर्भात रेल्वेचे लोको पायलट इंद्रकुमार यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान मयताची ओळख पटेल असे कुठलेही कागदपत्र सापडलेले नाही. याप्रकरणी पहाटे ५ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय शिंदे हे करीत आहे.