चावलखेडा-पाळधी दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने वृध्दाचा जागीच मृत्यू

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गावातील मंडळींसह पत्नीसोबत चारधाम यात्रेसाठी निघालेल्या ७५ वर्षीय वृध्दाचा चावलखेडा-पाळधी दरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू  झाल्याची घटना शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. किसन तातेराव गरुड (वय-७५, रा. मटकहाडा, जि. परभणी) असे मृत वृध्दाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील मटकहाडा येथील किसन गरुड हे पत्नीसह गावातील काही जणांसोबत चारधाम यात्रा करण्यासाठी निघाले होते. रेल्वेतून प्रवास करीत असतांना चावलखेडा-पाळधी  अपलाईनवरील खांबा क्रमांक २२५/३५ दरम्यान, धावत्या रेल्वेतून वृद्ध किसन गरुड यांचा तोल जावून ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना स्टेशनमास्टर समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पाळधी दूरक्षेत्र पोलिसांना दिली. त्यानुसार गजानन महाजन व शब्बीर अली सैय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांची तपासणी केली. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या आधारकार्डवरुन त्यांची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून घटनेची महिती दिली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता उशिरा त्यांचे कुटुंबिय जळगावात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी वृद्ध गरुड यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

 

Protected Content