
उस्मानाबाद (वृत्तसंस्था) शहरातील एन्जॉय नेट कॅफेमध्ये अवघ्या ४० रुपयांच्या बिलावरून झालेल्या वादातून ग्राहकाने नेट कॅफे मालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, दशरथ गेमा पवार (वय-36, रा. घाटगरी, ता.उस्मानाबाद) हा मागील काही वर्षांपासून उस्मानाबाद शहरात एन्जॉय नेट कॅफे चालवत होता. आरोपी विनोद लंगळे हा इंटरनेटवर काही कामानिमित्त आला होता. त्याने इंटरनेटचा वापर केल्यानंतर नेट कॅफेचे 40 रुपयांचे बिल देण्यास नकार दिला. त्यावरून कॅफे मालक दशरथ पवार व ग्राहक विनोद लंगळे यांच्यात वाद झाला. थोड्याच वेळात या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. विनोद लंगळे याने दशरथ पवार यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. छातीवर जोरदार मार लागल्याने दशरथ पवार हे बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. दरम्यान, आरोपी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला होता.