अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्त्रीवादाची मांडणी करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका प्रतिमा परदेशी, स्त्रीवादी लेखिका संध्या नरे-पवार, तमन्ना इनामदार, प्रा.डॉ.वंदना महाजन, प्रा.डॉ.रेखा मेश्राम, कवयित्री प्रतिभा अहिरे, लक्ष्मी यादव, लढाऊ विद्यार्थी नेत्या निहारिका आणि साम्या, सुप्रसिद्ध युवा रॅप आर्टिस्ट जी माही हे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात येणार आहेत. संमेलनातील सर्वोत्कृष्ट महिला साहित्यिकांच्या बौद्धिक मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन विद्रोही च्या संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अमळनेर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत दोन दिवस होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या विविध मंडपात संपन्न होणाऱ्या विविध बौद्धिक व वैचारिक चर्चांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखिका यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. सत्यशोधक स्त्रीवादाची मांडणी करणाऱ्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष तथा
पुणे येथिल लेखिका प्रतिमा परदेशी, ‘सावित्रीबाई फुले आणि बेईमान लेखण्या’ , ‘मला हवी असणारी पहाट’ यासारख्या काव्यसंग्रहासह ‘सामाजिक परिप्रेक्ष्यातून स्त्रियांची आत्मकथने’, ‘साहित्याचे समाजशास्त्र’ यासारख्या पंधरा ग्रंथांच्या लेखिका सुप्रसिद्ध कवियत्री प्रतिभा अहिरे, “तिची भाकरी कोणी चोरली’ या ग्रंथाच्या माध्यमातून बहुजन स्त्रीवादाची मांडणी करणाऱ्या तसेच चित्रलेखा, परिवर्तनाचा वाटसरू, यासारख्या नियतकालिकातून महिलांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका संध्या नरे-पवार, ‘स्त्री वाद आणि मराठी साहित्य ‘ ‘वादळवाट ‘ च्या सुप्रसिद्ध लेखिका मुंबई विद्यापीठातील प्रा.डॉ.वंदना महाजन, मुस्लिम महिलांच्या प्रश्नावर लेखन करणाऱ्या, ‘मुस्लिम बलुतेदार पुस्तकाच्या लेखिका, सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्या पुणे येथिल तमन्ना इनामदार यांचे सह खानदेशातील व स्थानिक इतर अनेक महिला लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या दोन दिवसातील विविध परिसंवादातून व गटचर्चातून आपली भूमिका मांडणार आहेत.
रॅप या आधुनिक गायन प्रकाराच्या माध्यमातून लाखो युवा चाहत्यांपर्यंत पोहोचलेली सुप्रसिद्ध रॅप आर्टिस्ट जी माही या संमेलनात आपल्या गीतांचे सादरीकरण करणार आहेत. विद्यार्थी संघटनेच्या नेत्यां निहारिका आणि साम्या या शैक्षणिक धोरणावर आपले विचार मांडणार आहेत. मराठी काव्य व गजल संमेलनात सुप्रसिद्ध कवयित्री लक्ष्मी यादव, सिल्किशा अहिरे, संगीता बडे, सविता घोडे, मीराताई इंगोले, पौर्णिमा मेश्राम, माधुरी वसंत शोभा, रोहिणी टाकळकर, अर्चना परदेशी, कल्पना पुसाटे यासारख्या कवयित्री आपले काव्य व गजल सादरीकरण करणार आहेत.
विद्रोही साहित्य संमेलनाच्या विविध गटचर्चा व परिसंवादांच्या तसेच काव्य व गजल संमेलनातील साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन ठीक ठिकाणी महिलांच्या जागर बैठका घेऊन विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीच्यावतीने करण्यात येत आहे.