भुसावळ, प्रतिनिधी | येथील प्रतिष्ठा महिला मंडळ व सोनिच्छा ड्रॉईंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आज (दि.१२) येथील संतोषीमाता हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेस पाच वर्षांवरील सर्व मुलामुलींनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला, विशेष म्हणजे ही कार्यशाळा विनामूल्य होती. शहरातील २१० मुले या कार्यशाळेत सहभागी झाली होती. त्यांनी यावेळी मनसोक्त आनंद घेत गणपतीच्या वेगवेगळ्या रूपातील सुंदर मूर्ती बनवल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते. त्यांनी सर्व बालगोपालांशी संवाद साधला. पर्यावरणाला पूरक शाडू मातीची गणपतीची मूर्ती लहान मुलांनी बनवणे व त्याच मूर्तीचे पालकांनी स्थापना केली तर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना ह्या माध्यमातून वाव मिळेल व पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे संस्कार मुलांवर होईल म्हणून ह्याच मूर्तीची स्थापना करण्याचा संकल्प करूया असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी यावेळी केले. आगामी गणेश उत्सव हा पर्यावरण पूरकच साजरा करूया असेही ते म्हणाले. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या उद्देश स्पष्ट केला. कार्यशाळेचे प्रशिक्षक खिरोदा येथील चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल मालखेडे यांनी मुलांना साध्या व सोप्या पद्धतीने मूर्ती कशी बनवतात याचे प्रशिक्षण दिले. सर्व बालगोपालांनी यावेळी सुंदर मूर्ती तयार केल्या. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय सावकारे, अतुल मालखेडे, रजनी सावकारे, जयश्री चौधरी हे उपस्थित होते.मंडळाच्या सदस्या सपना जंगले, रिया पिंपळे, वैशाली भदाणे, पारस, प्रेरणा, किरतेस, कार्तिकेय, निकिता व नक्षत्र यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अलका भटकर यांनी केले.