जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या गाडेगाव येथील प्रौढाचा बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावेळी नातेवाईकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज त्र्यंबक शिरसाळे वय ५३ रा. गाडेगाव ता. जामनेर असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे मनोज शिरसाळे हे आपल्या पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला होते. सुप्रिम कंपनीत कंत्राटी पध्दतीने ते नोकरीला होते. गुरूवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी हे त्यांच्या खासगी कामासाठी नेरी गावात गेले होते. काम आटोपून रात्री ८ वाजता ते घरी जाण्यासाठी नेरी येथील महामार्गावर उभे होते. त्यावेळी जळगावकडे जाणाऱ्या मालवाहू पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ सीएक्स १०६८) ने मनोज शिरसाळे यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. हा प्रकार पाहून वाहनचालक वाहन घेवून पसार झाला. त्यामुळे येथील काही संतप्त तरूणांनी त्यांचा पाठलाग केला.

रस्त्यावरील उमाळे फाट्याजवळ चालकाने वाहन थांबवून लॉक करून पळ काढला. जखमी झालेल्या मनोज शिरसाळे यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. रात्री १० वाजता त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. यावेळी त्यांच्या पत्नीसह नातेवाईकांनी रूग्णालयात एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



