जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यरात्रीच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली झोकून देत दीपक अरुण पाटील (वय ४८, रा. रामचंद्रनगर, अयोध्या नगर) यांनी आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी ८ जुलै रोजी मध्यरात्री १२.३० वाजता असोदा ते जळगाव दरम्यान अपलाईनवर घडली. घटनास्थळावर लावलेल्या दुचाकीवरुन त्यांची ओळख पटविण्यात आली असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील अयोध्या नगरातील रामचंद्र नगरात दीपक पाटील हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते, एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवारी ८ जुलै रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास दीपक पाटील हे दुचाकीने असोदा रेल्वे गेट परिसरात आले. त्यांनी अपलाईनवरील खांबा क्रमांक १२२/६ दरम्यान, धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोहेकॉ शशिकांत पाटील, रविंद्र इंधाटे, पोना विनोद अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांना घटनास्थळाहून काही अंतरावर एक दुचाकी मिळून आली. पोलिसांनी मयत दीपक पाटील यांची अंगझडती घेतली असता, त्यांना खिशात दुचाकीची चावी मिळून आली. पोलिसांनी दुचाकीला चावी लावून बघितल्यानंतर ती दुचाकी दीपक पाटील यांची असल्याची खात्री झाली. दुचाकीच्या क्रमांकावरुन पोलिसांनी माहिती काढून त्यावर दिलेल्या क्रमांकावरुन दीपक पाटील यांच्या नातेवाईकांची संपर्क साधला. त्यांना घटनेची माहिती देत त्यांची ओळख पटवली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. प्राथमिक तपास पोलीस नाईक विनोद अहिरे हे करीत आहे.



