जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील क्रीडा संकुलाजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेले जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी यांचा उपचार सुरू असताना सोमवारी ३० डिसेंबर दुपारी ३ वाजता मृत्यू झाला. याबाबत सायंकाळी ६.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप काशिनाथ वानखेडे (वय-५५, रा. खोटेनगर) हे गुरुवारी २६ डिसेंबर दुपारी दीड वाजेच्या सुमारास शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात कॅफोसह गेले होते. जेवणाचा डबा नसल्याने महाराष्ट्र बँकेलगत ते पराठे घेण्यासाठी आले. त्यांनी पोलिस निवासस्थानाजवळ वाहन लावून ते पायी रस्ता ओलांडत असताना क्रीडासंकुलाकडून येणाऱ्या भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली होती. यात ते हवेत फेकले जावून खाली पडले व त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. इतर सहकाऱ्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
मयत दिलीप वानखेडे यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी आहे. दोन्हीही अविवाहीत आहे. अगोदरच या मुलांचे मातृछत्र हरविलेले असल्याची माहिती जि.प. कर्मचाऱ्यांनी दिली. आता पित्याचाही मृत्यू झाल्याने दोन्ही मुले पोरके झाले आहे. याप्रकरणी सायंकाळी ६.३० वाजता अज्ञात दुचाकीचालकावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.