मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात उभारण्यात येत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम सुरू असतांना सळयांचा पिंजरा अंगावर पडून झालेल्या अपघातात दोन मजुर किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मुक्ताईनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून याचे काम प्रवर्तन चौकाच्या जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू आहे. या पुतळ्यावरून मध्यंतरी आमदार आणि खडसे समर्थकांमध्ये वाद देखील झाले होते.
दरम्यान, आज पुतळ्यासाठीचा चौथरा उभारण्याचे काम सुरू असतांना मजुरांच्या अंगावर सळयांचा पिंजरा पडला. यात दोन मजूर जखमी झाले आहेत. या मजुरांचे नाव लखन शर्मा व विजय शर्मा असून ते बिहारमधील कटिहार येथील रहिवासी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी मजुरांना तात्काळ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या साधा अपघात असून कुणीही या प्रकरणी सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत असे आवाहन प्रशासन व शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे. या दोन्ही मजुरांची प्रकृती ठणठणीत असल्याने कुणी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.