जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मानवी हक्कांच्या जपणुकीसाठी आणि समाजातील अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी अमोल अशोक कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील सामाजिक चळवळींना आणि मानवाधिकार जनजागृतीला नवे बळ मिळणार आहे.
ही संस्था मानवतावादी दृष्टिकोनातून अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरुद्ध लढा देत असून, समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी सतत आवाज उठवत आली आहे. संस्थेचा उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये त्यांच्या मूलभूत हक्कांविषयी जागृती निर्माण करणे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर व सामाजिक पातळीवर लढा देणे हा आहे.

या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा कमिटीच्या अध्यक्षपदी अमोल कोल्हे यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. अमोल कोल्हे हे माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष तसेच छावा मराठा युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. गेली अनेक वर्षे ते सामाजिक, राजकीय, पत्रकारिता आणि माहिती अधिकार या क्षेत्रांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत.
या निवडीचे पत्र मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले असून, कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील मानवी हक्कांच्या लढ्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे. जिल्ह्यात विविध सामाजिक प्रश्नांवर जनजागृती मोहीम, कायदेशीर सहाय्य आणि सार्वजनिक उपक्रम आयोजित करून समाजपरिवर्तनाचा प्रयत्न करण्यात येईल, असेही संस्थेच्या निवेदनात म्हटले आहे.
या नियुक्तीनंतर संस्थेचे राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अमोल कोल्हे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कार्य अधिक वेगाने आणि परिणामकारकपणे पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



