मुंबई, वृत्तसंस्था | बिहार राज्यात सध्या पुराने कहर मांडला आहे. पूरग्रस्तांसाठी मदत कार्य जोरात सुरू आहे. मदत करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने मदत देत आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चनही पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी या राज्यासाठी ५१ लाख रुपयांचा धनादेश नुकताच दिला आहे.
अमिताभ यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ लाखांची मदत केली असून बच्चन यांचे प्रतिनिधी विजयनाथ मिश्र यांच्याद्वारे मदत निधीचा धनादेश बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. तसेच अमिताभ यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यासाठी लिहिलेले पत्रही मिश्र यांनी मोदी यांच्याकडे दिले आहे.
सुशील मोदी यांनी दिली माहिती
सुशील मोदी यांनी ट्विट करून व एक फोटो शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. ‘पुरग्रस्त बिहारच्या मदतीसाठी प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांचे प्रतिनिधी विजय नाथ मिश्र यांच्याद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ लाखांचा धनादेश दिला आहे’ असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
काय आहे अमिताभ यांच्या पत्रात ?
अमिताभ बच्चन यांनी पत्रात बिहारमध्ये आलेल्या आसमानी संकटाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ‘पूरग्रस्तांबाबत संवेदना आणि सहानभूती व्यक्त केल्या आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माझ्याकडून खारीचा वाटा देत आहे’ असे म्हणत अमिताभ यांनी धनादेश आणि रक्कमेची माहिती पत्रात नमूद केली आहे. राजधानी पाटणासह बिहारमध्ये बचावकार्य सध्या प्रचंड वेगात सुरू आहे. तिथे झालेल्या जोरदार पावसाने आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला असून, मालमत्तेचे प्रचंड नुकसानही झाले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ) यांच्या जवानांकडून मदत सामग्रीचे वाटप करण्यात येत आहे. भारतीय हवाई दलाची हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागांवर लक्ष ठेवून अन्नाची पाकिटे आणि इतरही साहित्य रहिवाशांपर्यंत पोहोचविण्याकडे लक्ष देत आहेत.
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांनाही दिली होती मदत
कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत महापुरानं थैमान घातलं होतं. यावेळी देखील बिग बी पूरग्रस्तांच्या मदतीला धावले होते.बिग बी यांनी यांनी ५१ लाखांची मदत केली होती.