Home राजकीय अमित शाहांची एकनाथ शिंदेंना हमी ! महायुतीतील तणावात दिलासा

अमित शाहांची एकनाथ शिंदेंना हमी ! महायुतीतील तणावात दिलासा

0
133

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा तडाखा शिगेला पोहोचत असताना महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सुरू झालेल्या ‘फोडाफोडीच्या’ राजकारणाने वातावरण तापले आहे. भाजपाकडून सुरू झालेल्या कथित शिलकी हालचालींमुळे नाराज झालेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीस गैरहजेरी लावत आपली नाराजी थेट दाखवून दिली. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत पक्षातील ताणतणावाबाबत सविस्तर तक्रारी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमित शाहांसोबतच्या दिल्लीतील या महत्त्वपूर्ण बैठकीत शिंदे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह काही नेत्यांविरुद्ध नाराजी व्यक्त केली. शिंदेंनी मांडलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत अमित शाह यांनी “महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं पूर्ण लक्ष आहे. तुम्ही एनडीएतील महत्त्वाचे नेते आहात, तुमचा मान आणि स्थान योग्य प्रकारे राखला जाईल,” असे आश्वासन दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या आश्वासनामुळे शिंदे गटातील अस्वस्थता काही प्रमाणात निवळण्याची चिन्हे दिसत आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत गैरहजेरी लावून नाराजी दर्शवलेल्या मंत्र्यांना स्वतः शिंदे यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्याच फोडाफोडीच्या आरोपांची आठवण करून दिल्याने त्या भेटीत वातावरण अधिकच तीव्र झालं होतं. या घटनांमुळे महायुतीमध्ये निर्माण झालेला ताण दिल्लीपर्यंत पोहोचला आणि अखेर एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांची भेट घेणे अपरिहार्य झाले.

अमित शाह यांच्या आश्वासनानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाला नवे निर्देश दिले आहेत. “आता यापुढे शिवसेनेचा धनुष्यबाण असलेला कोणताही पदाधिकारी भाजपात घेऊ नये आणि भाजपाचा कोणताही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही,” असे स्पष्ट आदेश शिंदे यांनी दिल्याचे शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शिंदे गटाने आतूनच ‘फोडाफोडीला’ बंदी घालण्याचे संकेत दिल्याने आता या निर्णयावर भाजपा नेमकी काय भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये सातत्याने पडसाद उमटत असताना, शिंदे-भाजपा मतभेदांचा प्रश्न किती लांबणार आणि महायुतीचे भवितव्य कोणत्या मार्गाने जाणार, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.


Protected Content

Play sound