Home राजकीय अमित शाह मुंबई दौऱ्यावर, मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदेंशी तातडीची बैठक

अमित शाह मुंबई दौऱ्यावर, मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदेंशी तातडीची बैठक


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात सध्या प्रचंड संतापाचे वातावरण असून, आंदोलनाला आता अधिक तीव्र रूप प्राप्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले असून, त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी तब्बल तासभर मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केली. तर दुसरीकडे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू आहे आणि आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह त्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. प्रशासनाने त्यांना सुरुवातीला एका दिवसाची परवानगी दिली होती, परंतु त्यानंतर आंदोलनाची मुदत वाढवण्यात आली आहे. उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, आंदोलकांची संख्या वाढत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी माध्यमांसमोर बोलताना १० टक्के आरक्षण आधीच दिले असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी अभ्यास करून मागणी करावी, असा सल्ला दिला होता. मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असून, केवळ आश्वासनांवर विश्वास न ठेवता ठोस निर्णयाची मागणी करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक अधिक आक्रमक होत आहेत.

दरम्यान, अमित शाह आज गणपती दर्शनासाठी मुंबईत दाखल झाले. पण मंदिरात जाण्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर बंद दाराआड तासभर चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, मराठा आरक्षणावरच ही चर्चा केंद्रित होती. दिल्लीतून थेट आलेले अमित शाह या प्रकरणात लक्ष घालू लागल्याने सरकारवरचा दबाव वाढल्याचे दिसत आहे.

सीएसएमटी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांचा संयम सुटू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आझाद मैदानात सुरू असलेल्या उपोषणाच्या जागेवरून काही आंदोलक महापालिकेच्या समोर रस्त्यावर उतरले आणि ठिय्या आंदोलन सुरू केले. परिणामी परिसरात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक भागांत चक्का जाम झाल्याचे पाहायला मिळाले.

याचदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी बीएमसी आयुक्तांवर थेट शब्दांत टीका केली. “आयुक्त कोण आहे, नाव लिहून ठेवा… कधी ना कधीतरी वेळ बदलेल, निवृत्तीनंतरही सुट्टी मिळणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. पालिकेवर सध्या प्रशासक असून, सर्व नियंत्रण मुख्यमंत्र्यांकडे असल्याचा आरोप त्यांनी केला.

तरीही आंदोलकांना शांततेचं आणि संयमाचं आवाहन करत, “आपल्याला राजकारण नको, फक्त आरक्षण हवं आहे. कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्या,” असं आवर्जून सांगताना त्यांनी सामान्य मुंबईकरांना त्रास न होईल याचीही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.


Protected Content

Play sound