मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या आठवड्यात बंडखोरी करत शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले पालघरचे बंडखोर आमदार अमित घोडा हे आता पुन्हा शिवसेनेत परतणार आहेत. आज आ.घोडा आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला गळती लागली असतानाच पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी 3 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आ.घोडा यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवाब मलिक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्जही भरला. मात्र, आता ते त्यांची उमेदवारी मागे घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. दि. 6 ऑक्टोबर, रोजी दुपारपासून अमित घोडा यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांच्या ते संपर्कात नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली.
शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने नाराज होऊन अमित घोडा यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, आता पुन्हा ते शिवसेनेत जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना पक्षात टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर आहे. तसेच, जर अमित घोडा यांनी उमेदवारी मागे घेतली तर पालघर मतदारसंघातून राष्ट्रवादीला नवा उमेदवार उभा करावा लागणार आहे. त्यामुळे सध्या पालघरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळू शकतात.