
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल ते जळगाव शहराला कमी वेळेत जोडणाऱ्या शेळगाव बॅरेजच्या मार्गावरील पुलावरून रुग्णवाहिकांना जाण्याची परवानगी मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी जनहिताच्या दृष्टीने केलेल्या मागणीला यश मिळाल्याने अनेक रुग्णांचे जीव वाचणार आहेत.

या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता भूषण अहिरे यांना निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी म्हटले होते की, मागील अनेक वर्षांपासून यावल तालुक्यातील विविध गावांमधून सर्पदंश झालेले, विष प्राशन केलेले किंवा अपघातात गंभीर जखमी झालेले रुग्ण पुढील उपचारांसाठी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात येतात.
यावल ते भुसावळ मार्ग जळगाव असो किंवा यावल ते विदगाव मार्ग जळगाव असो, हे दोन्ही मार्ग एक ते दीड तासांचा वेळ घेणारे आहेत. अशा प्रसंगी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत आणि त्यामुळे अनेक रुग्णांचा वाटेतच जीव गेल्याचे किंवा जात असल्याचे सोनार यांनी निदर्शनास आणून दिले होते.
या गंभीर समस्येवर उपाय म्हणून नितीन सोनार यांनी पाटबंधारे विभागाचे अभियंता भूषण अहिरे यांची भेट घेऊन शेळगाव बॅरेजवरील पुलावरून किमान रुग्णवाहिकांना जाण्याची परवानगी मिळाल्यास अनेकांचे जीव वाचतील, अशी माहिती दिली. त्यांनी रुग्णवाहिकांना या मार्गावरून सोडण्याची निवेदनाद्वारे विनंती केली. या विनंतीला पाटबंधारे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
शाखा अभियंता भूषण अहिरे यांनी जनहिताच्या दृष्टीने यावल ते जळगाव शेळगाव बॅरेजच्या पुलावरून रुग्णवाहिका सोडण्यात येतील, अशी सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे मान्य केले आहे. यामुळे यावल परिसरातील रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यास मदत होईल आणि वेळेअभावी होणारे मृत्यू टळू शकतील.



