अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील यात्रोत्सवात पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत एका तरूणाला गावठी पिस्तुल आणि जीवंत काडतुसांसह ताब्यात घेतले आहे.
अमळनेर नगरीत सध्या संत सखाराम महाराज यांचा यात्रोत्सव सुरू आहे. या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त लावला आहे. हवालदार राजेंद्र कोठावदे, सुनील हटकर, नीलेश मोरे, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे यांना पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी एक तरूण गावठी पिस्तुलासह येत असल्याची माहिती दिली.
या अनुषंगाने पोलिसांनी सापळा लावला. १४ रोजी पहाटे साडेबारा वाजता बिना क्रमांकाच्या लाल दुचाकीवर लावलेल्या रूपेश सुरेश माने (वय २१) या तरूणाची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे आढळून आली. रूपेश माने हा प्रताप मिल परिसरातील दगडी चाळ-मधील रहिवासी असून तो खासगी वायरमन म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याजवळील दुचाकीसह पिस्तुल व जिवंत काडतूसे असा एकूण ९० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर करत आहेत.