अमळनेर प्रतिनिधी | अमळनेरसाठी स्वतंत्र शहर पोलीस स्थानक उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीव वर्मा यांनी दिलेल्या भेटीत आ. अनिल पाटील यांनी याबाबतची चर्चा केली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीत हे स्थानक उभारण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचायाबाबत वृत्त असे की, अमळनेर शहरात लवकरच नवीन प्रस्तावित प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे यासाठी शासन स्तरावरून देखील हालचालीना वेग आला आहे. शहरातील पाच पावली मंदिराजवळील पोलीस लाइन च्या जागेवर महसूल ची नवीन प्रशासकीय इमारत बनावी यासाठी आमदार अनिल पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीव वर्मा यांनी अमळनेरचा दौरा करून संबंधित क्षेत्राची पाहणी केली.
पोलीस स्टेशन शहराबाहेर असल्याने तसेच त्या ठिकाणी कर्मचार्यांची निवासस्थाने देखील उपलब्ध करून दिली असल्याने शहरातील जुन्या पोलीस लाईनीची जागा महसूल विभागाला मिळावी यासाठी पोलीस विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आलेला असून यावर मंत्रालयीन स्तरावर चर्चा करून गृहमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार अतिरिक्त महासंचालक यांनी शहराला भेट देऊन आढावा घेतला, याचा वस्तूनिष्ठ अहवाल तयार करून मंत्रालयीन बैठकीत सादर केला जाणार आहे.यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश चोपडे,परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक ऋषीकेश रावल,प्रांताधिकारी सीमा अहिरे उपस्थित होत्या.
या कामासाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी अधिवेशनात १४ कोटी १७ लाखांची मान्यता देखील दिलेली आहे,पण त्यासाठी महसूल विभागाकडून जागेची जी निवड केली गेली होती ती शहराबाहेर असल्याने तिथे जर इमारत बांधली गेली तर सामान्य लोकांची गैरसोय होऊ शकते,यासाठी शहरातच असलेल्या पाचपावली चौकातील जुन्या पोलीस लाईनीच्या जागेचा प्रस्ताव मंत्रालयीन बैठकीत मांडलेला आहे. अमळनेर तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठं असल्याने तालुक्यासाठी शहर व तालुका पोलीस स्टेशन स्वतंत्र असावेत ही मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मारवड पोलीस स्टेशन च्या माध्यमातून ग्रामीण चा काही भाग सांभाळण्यास मदत होत असते.मात्र गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याने आता शहरात स्वतंत्र शहर पोलीस स्टेशन ची मागणी करण्यात येत आहे.याचाच भाग म्हणून हल्लीच्या प्रशासकीय इमारतीच्या जागेवर शहर पोलीस स्टेशन उभारण्यासाठी आमदार अनिल पाटील यांच्याकडून पाठपुरावा होत असून शहर पोलीस स्टेशन झाल्यास गुन्हेगारीवर वचक बसेल.