Home Cities अमळनेर २५ लाखांच्या खंडणीप्रकरणी अमळनेर पोलिसांची कारवाई; सोशल मीडियावर बदनामीची धमकी देणारा आरोपी...

२५ लाखांच्या खंडणीप्रकरणी अमळनेर पोलिसांची कारवाई; सोशल मीडियावर बदनामीची धमकी देणारा आरोपी अटकेत


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित गंभीर खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश अमळनेर पोलिसांनी केला असून सोशल मीडियावर खोटी व बनावट माहिती प्रसारित करण्याची धमकी देत २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

आज दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी अमळनेर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अशोक हरी खलाणे, रा. नेताजी चौक, चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनंत रमेश निकम, रा. श्रीकृष्ण कॉलनी, अमळनेर याच्याविरोधात बीएनएस कायदा कलम ३०८ (२), ३०८ (३) अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अशोक खलाणे हे चाळीसगाव येथील महात्मा फुले सामाजिक शिक्षण विकास मंडळ या संस्थेत सचिव पदावर कार्यरत असून संस्थेच्या अखत्यारित एकूण १४ अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महाविद्यालये चालवली जातात. संस्थेअंतर्गत जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव येथील १५ शिक्षकांच्या गैरवर्तनामुळे फिर्यादी यांनी शिस्तभंगाची कारवाई करत सेवा समाप्तीचे आदेश दिले होते.

या कारवाईचा राग मनात धरून संबंधित शिक्षकांनी संस्थेविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या, ज्यामुळे संस्थेवर प्रशासक नियुक्तीचा आदेश झाला. मात्र या आदेशाविरोधात फिर्यादी यांनी माननीय उच्च न्यायालयात दाद मागून प्रशासक नियुक्तीच्या आदेशाला स्थगिती मिळवली होती. याचदरम्यान फिर्यादी यांच्याविरोधात दाखल असलेल्या काही गुन्ह्यांमध्येही त्यांनी जामीन मंजूर करून घेतलेला आहे आणि सद्यस्थितीत ती प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

असे असतानाही आरोपी अनंत रमेश निकम याने दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी फेसबुकवरील ‘अनंत निकम’ या प्रोफाईलवरून फिर्यादी व त्यांच्या संस्थेबाबत खोटी व बनावट माहिती प्रसारित केली. त्यानंतर ९ नोव्हेंबर व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपीने आपल्या साथीदारांमार्फत फिर्यादी यांना अमळनेर येथे बोलावून एकूण २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास खोटे व्हिडीओ तयार करून प्रसारित करण्याची, तसेच खोट्या व गंभीर स्वरूपाच्या अजामीनपात्र गुन्ह्यांत अडकवून आयुष्यभर तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

खंडणीची रक्कम कमी करण्यासाठी फिर्यादी यांनी नगराज चिंतामण वाघ यांच्यामार्फत चर्चा केल्यानंतर आरोपीने ४ ते ५ लाख रुपये द्यावेच लागतील, असा दबाव वाढवला. अखेर या सततच्या धमक्यांना कंटाळून फिर्यादी यांनी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी अनंत रमेश निकम याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.


Protected Content

Play sound