अमळनेर प्रतिनिधी । विवाहाच्या बहाण्याने लूट करणार्या रॅकेटचा पर्दाफाश मारवड पोलिसांनी केला असून यात तब्बल तेराव्या विवाहाच्या तयारीत असणार्या तरूणीसह तिच्या आप्तांना अटक करण्यात आली आहे.
शहादा तालुक्यातील मंदाणे येथील भूषण संतोष सैंदाणे या युवकाचे हिंगोली येथील सिद्धार्थ नगरातील सोनू राजू शिंदे या युवतीशी ६ मे रोजी लग्न झाले होते. त्यानंतर १५ मे रोजी नवविवाहितेने सासरहून पोबारा केला होता. त्यामुळे १६ मे रोजी पती भूषण सैंदाणे याने शहादा पोलिस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दिली होती.
दरम्यान, संबंधीत तरूणी ही पढावद (ता.शिंदखेडा) येथे प्रवीण शिवाजी पाटील या दुसर्या मुलाशी अमळनेर तालुक्यातील कपिलेश्वर मंदिरावर लग्न करीत असल्याची माहिती शहादा पोलिसांना मिळाली होती. मात्र येथे सध्या लॉकडाऊनमुळे विवाहादी समारंभांना बंदी घालण्यात आली असल्याचे त्यांना कळले. यामुळे हा विवाह नरडाणा जवळच्या मुडावद येथे होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. येथे फसवणूक करणार्या नवरीसह तिच्या आप्तांना ताब्यात घेण्यात आले.
विवाहाच्या नावाखाली लुबाडणुक करण्याचा या टोळींचा धंदा असून यातून आजवर तब्बल १३ जणांना गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती यातून मिळाली आहे. मात्र ही कारवाई होत असतांना लग्न जमवून देणारा दलाल, नवरीची आई व भाऊ यांनी पांझरा नदीतून चारचाकी आणि पैसे घेऊन पोबारा केला. तर नवरीचे मामा योगेश संजय साठे (रा. शिवसेनानगर,अकोला), नवरीची मावशी पूजा प्रताप साळवे (रा. सिद्धार्थनगर, हिंगोली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी शहादा येथील पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.