अमळनेर गजानन पाटील | अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आमदार अनिल पाटील यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रतोदपदाची महत्वाची जबाबदारी असून आता विधीमंडळातील कामकाजातही त्यांनी चमक दाखविल्याचे नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातून दिसून आले आहे. अनिल पाटील हे जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देशातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत. अलीकडच्या सत्तांतरामध्ये जिल्ह्यातील शिवसेनेचे चार व एक सहयोगी आमदार शिंदे गटासोबत गेल्याने महाविकास आघाडी चे ते विधानसभेतील एकमेव आमदार आहेत. त्यांच्या जोडीला विधानपरिषदेत आ एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत जोरदार फटकेबाजी करून सत्ताधार्यांना जेरीस आणले. तर विधानसभेत हीच जबाबदारी अनिल पाटील यांनी पार पाडली.
नगरविकास विभागाच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने थेट जनतेतून सरपंच निवडीसंदर्भात सरकारने मांडलेल्या बिलावर विरोधी पक्षाच्या वतीने भाषण करताना आमदार पाटील यांनी सत्ताधार्यांवर हल्लाकोल केला. एखाद्या लहान समाजाचा व्यक्ती अतिशय चांगले काम करीत असेल किंवा अभ्यासू वृत्तीमुळे तो सरपंच किंवा नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसण्यास लायक ठरत असेल तर पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे सदस्यांमधून त्याला त्या पदावर बसविण्याचा न्याय दिला जाऊ शकतो. मात्र जर जनतेतून त्याला सरपंच किंवा नगराध्यक्ष पदावर निवडायचे म्हटल्यास त्या गावातील किंवा शहरातील मोठ्या समाजाची मंडळी त्याला कधीही त्या पदावर जाऊ देणार नाही यामुळे एकप्रकारे हा अन्यायच असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकनियुक्त ही पद्धतच चुकीची व अन्यायकारक असल्याने पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून नगराध्यक्ष किंवा सरपंच पदाची निवड करणे योग्य राहील अशी भूमिका त्यांनी रोखठोकपणे मांडली.
यासोबत दुष्काळ संदर्भात विरोधी पक्षसंदर्भात २९३ अंतर्गत सभागृहात प्रस्ताव मांडला असतां यावेळी देखील आमदार अनिल पाटील यांनी शेतकर्यांना अतिवृष्टी चे पैसे या शासनाने न दिल्याने जोरदार हल्लाबोल केला. यावर बोलताना ते म्हणाले की अमळनेर मतदारसंघासह जिल्ह्यात २०१९ पासून अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे जे नुकसान झाले होते,त्याचा मोबदला म्हणून शेतकर्यांना भरपाई देण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांनी निधी वितरित करण्यास मान्यता दिली असताना हे सरकार तो पैसा वितरित करीत नसल्याने अनिल पाटलांनी शासनावर जोरदार टिकास्त्र सोडले.
यासोबत विधीमंडळाच्या पायर्यांवर विरोधी पक्षाचे आमदार सत्ताधारी मंडळीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत असताना आमदार अनिल पाटील यांनी गाजरांची माळ घालून केलेल्या घोषणाबाजीने ते राज्यभरात चर्चेत आले. अर्थात, या अधिवेशनात आमदार अनिल पाटील यांनी आपल्या कामाची छाप पाडल्याचे दिसून आले आहे.