जेलमधून फरार कैद्यांनी अमळनेरात एकाची दुचाकी पळविली

अमळनेर प्रतिनिधी । जळगावच्या जेलमधून फरार झालेल्या गुन्हेगारांशी शहरातील एका तरूणाला पिस्तुलाचा धोक दाखवून त्याची दुचाकी घेऊन पळ काढल्याचे समोर आल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या २५ जुलैला जळगाव कारागृहातून तीन कुख्यात आरोपींनी पलायन केले होते. या तिघांचा कसून शोध घेण्यात येत असला तरी अद्याप त्यांना जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. हे तिन्ही कैदी नेमके कुठे गायब झालेत या विचाराने पोलीस यंत्रणा त्रस्त झालेली असतांनाच यातील दोन गुन्हेगारांनी अमळनेरात एका तरूणाला लुटल्याची माहिती समोर आली आहे.

अमळनेर शहरातील ताडेपुरा येथील रहिवासी सनी अनिल कचरे हे अंबर्षी टेकडीवर फिरण्यासाठी गेला होता. येथे त्याने रनिंगसह व्यायाम केला. यानंतर तो घरी परत येत असतांना दोघांनी त्याच्या डोक्याला पिस्तुल लावले. यानंतर त्याच्या खिशातून बळजबरीने मोटारसायकलची चावी काढून घेतली. यानंतर एम. एच.१९-डीएल ८५३४ या क्रमांकाची दुचाकी घेऊन त्यांनी पळ काढला. ही घटना १६ रोजी घडली होती.

पोलिसांनी संबंधीत गुन्हेगारांचे वर्णन आणि त्यांचे आपसातील बोलणे यांची तपासणी केली असता हे दोन्ही जण जळगाव जेलमधून पलायन केलेले गौरव पाटील व सागर पाटील असल्याची माहिती समोर आली. सनी कचरे याने या संशयाला दुजोरा दिला.

यानुसार गौरव पाटील व सागर पाटील या दोघांवर जबरी लुटीचा गुन्हा दाखल झाला. हे दोन्ही अमळनेर येथील रहिवासी असून त्यांच्यावर आधी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. यानंतर आता या दोघांचा अमळनेर परिसरातच वावर असल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता या भागात त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

Protected Content