अमळनेर प्रतिनिधी । आमच्याकडे औषधीचा पुरवठा करण्यासाठीचे सर्व परवाने आहेत….आता राज्य सरकारने परवानगी दिली तर आपण ना-नफा ना-तोटा तत्वावर १० लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करू असे प्रतिपादन अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.
याबाबत वृत्त असे की, सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. यातच राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नवाब मलिक यांनी अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू डॉ. रवींद्र चौधरी यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा अवैध साठा करत याचे वाटप चालविले असल्याचा गंभीर आरोप केला. शिरीष चौधरी यांनी तातडीने या आरोपाचे खंडन केले. यानंतर त्यांनी अमळनेर येथे आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी प्रति आव्हान दिले.
शिरीष चौधरी यांनी औषधीच्या वितरणासाठी त्यांच्याकडे असलेल्या परवानगीची कागपत्रे सादर केली. तर याप्रसंगी त्यांनी सत्ताधार्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, आमच्याकडे रेमडेसिविर इंजेक्शनसाठी लागणारे सर्व परवाने आहेत. शासनाने परवानगी दिल्यास आपण दहा लाख इंजेक्शन उपलब्ध करून देऊ शकतो. गरजू रुग्णांना आपण ना नफा ना तोटा या तत्वावर रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. काही कंपन्यांकडे उपलब्ध असलेला साठा जनतेला उपलब्ध करून घ्यावा अशीही मागणी आपण केली असल्याची माहिती शिरीष चौधरी यांनी दिली
याप्रसंगी त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्यावरही टीका केली. कोरोनामुळे खान्देशात मृत्यदर वाढला आहे. एकीकडे लोकांचे प्राण वाचवणे महत्वाचे आहे. मात्र आमदार अनिल पाटील राजकारण करत आहेत. त्यांनी तक्रार करण्याऐवजी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करावे असे आवाहन शिरीष चौधरी यांनी केले. आमदारांनी अमळनेरकारांना इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत, असे माजी आमदार चौधरी यांनी सांगितले. तसेच परवानगीची कागदपत्रे दाखवली. कोरोना काळात मिळालेल्या निधीत भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणी आपण पाठपुरावा करणार असल्याचा इशारा देखील शिरीष चौधरी यांनी याप्रसंगी दिला.