Home Cities अमळनेर अमळनेर पालिकेची स्वच्छतेत गरुडझेप: जिल्ह्यात पुन्हा नंबर वन !

अमळनेर पालिकेची स्वच्छतेत गरुडझेप: जिल्ह्यात पुन्हा नंबर वन !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या स्पर्धेत अमळनेर नगरपरिषदेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. एकूण १२५०० गुणांपैकी ९००३ गुण मिळवत अमळनेरने जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षीही अमळनेर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले होते. यंदाच्या सर्वेक्षणातील या कामगिरीमुळे अमळनेर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

स्वच्छता अभियान केवळ शासकीय यंत्रणांपुरते मर्यादित न ठेवता, त्यात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी अमळनेर नगरपालिकेने मोठी जनजागृती केली. याच प्रयत्नांचे फळ म्हणून, १७ जुलै २०२५ रोजी जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या निकालात अमळनेरने लक्षणीय यश मिळवले. शहराने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावण्याबरोबरच, ५० हजार ते ३ लाख लोकसंख्या गटात नाशिक विभागात ४ थ्या स्थानावर, तर संपूर्ण राज्यात १७ व्या स्थानावर मजल मारली आहे. देशातील ५० हजार ते ३ लाख लोकसंख्या गटातील स्वच्छ शहरांमध्ये अमळनेर नगरपरिषदेला ११० वे मानांकन मिळाले आहे.

या यशाबद्दल प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अमळनेर शहरातील सर्व नागरिकांचे, नगर परिषद स्वच्छता विभागातील निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांसह स्वच्छ सर्वेक्षणासाठी मेहनत घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. अमळनेर पालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणातील कामगिरीचा दर्जा सातत्याने सुधारला आहे. शहरवासीयांनी देखील जास्तीत जास्त स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत सर्टिफिकेशन आणि सव्र्हिस लेव्हल प्रोग्रेस हे प्रमुख घटक होते. सर्टिफिकेशनमध्ये हागणदारीमुक्त शहर (Open Defecation Free City) आणि कचरामुक्त शहर (Garbage Free City) मानांकनावर गुण दिले जातात. यात अमळनेर पालिकेला २५०० पैकी हागणदारीमुक्त शहरासाठी १००० गुण मिळाले. सिटिझन व्हॉइस प्रकारात पालिकेने केलेली जनजागृती आणि नागरिकांच्या प्रतिक्रियांचा समावेश होता. तर, सव्र्हिस लेव्हल प्रोग्रेसमध्ये १० हजार गुणांसाठी स्वच्छता अभियानांतर्गत केलेल्या कामांच्या कागदपत्रांची व प्रत्यक्ष पाहणीची नोंद होती, ज्यात पालिकेने ८००३ गुण मिळवले. यामुळेच यंदाच्या सर्वेक्षणात पालिकेचे मानांकन सुधारले आहे.


Protected Content

Play sound